बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी
प्रतिनिधी / बेळगाव
प्रेम प्रकरणात तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी मारहाण करणाऱयांविरोधात फिर्याद दिली. मात्र अद्याप मुख्य आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
मारहाण करणाऱयांना तातडीने अटक करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. संजय भरमा पाटील (वय 31, रा. बेनकनहळ्ळी) असे मयत युवकाचे नाव आहे. शनिवार दि. 23 रोजी सकाळी शेतवडीतील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र मारहाण करताना गावातील अनेकांनी पाहिले आहे. संजय पाटील याच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्या आरोपींना अटक केली नाही. यामुळे पोलिसांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. संजयच्या कुटुंबीयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. मात्र अजूनही तपास करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये भाऊ शंकर देसूरकर, बाळू परशुराम देसूरकर, जोतिबा परशुराम देसूरकर, वसंत परशुराम देसूरकर, अंजना बाळू देसूरकर, ललिता जोतिबा देसूरकर, जिजा परशुराम देसूरकर, रवी बाळू देसूरकर, वंदना बाळू देसूरकर, राजश्री बाळू देसूरकर, कृष्णा बाळू देसूरकर यांच्यासह इतरांवर फिर्याद दाखल केली आहे. या सर्वांसह इतरांनी संजयला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी हे जाणूनबुजून आरोपींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. संजयचा भाऊ सैन्यदलात आहे. त्याने डोळय़ांतून अश्रू काढतच न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. जर तातडीने अटक केली नाही तर पुन्हा भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गावचे प्रमुख पंच जोतिबा यादव देसूरकर, प्रकाश मोनाप्पा पाटील, रामा गावडू पाटील, महेश कोलकार, पुंडलिक देसूरकर, डॉ. राजू पाटील, मोहन कांबळे, अनंत मल्हारी पाटील, परशराम पाटील, बाळू कृष्णा पाटील, आप्पाजी जयवंत कंग्राळकर, निंगाप्पा देसूरकर, सुमन पाटील, कल्पना पाटील, भारती पाटील, अनिता पाटील, प्रेमा पाटील, सोनम पाटील, निंगुली पाटील, शांता पाटील, ऐश्वर्या पाटील, अंकुश पाटील, विठ्ठल पाटील, मारुती पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.