आरबीआय गव्हर्नरपदी कायम राहणार- आता 2024 पर्यंत कार्यकाळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 रोजी संपणार होता. मात्र, आता कार्यकाळ वाढवून मिळाल्यामुळे त्यांना डिसेंबर 2024 पर्यंत आरबीआय गव्हर्नर म्हणून काम पहावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नियुक्ती समितीने यासंबंधीचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.
2018 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. शक्तिकांत दास 1980 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. दास यांनी रिझर्व्ह बँकेचे कामकाज जवळून पाहिले आहे. ते भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य होते. याआधी त्यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता. दास यांनी गेल्या 38 वर्षात शासनाचा मोठा अनुभव घेतला आहे आणि वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी अर्थव्यवस्था तारण्यासाठी घेतलेले निर्णयही महत्त्वपूर्ण ठरले आहेत.