दिवाळी मुहूर्तावर एक तासाचे खास ट्रेडिंग
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुरूवारी सेन्सेक्स 296 अंकांसह आणि निफ्टी निर्देशांक 87 अंकांसह बंद होण्यात यशस्वी झाला. इंधन दरात अबकारी करात कपात करण्याच्या निर्णयाने पेट्रोल व डिझेलच्या किंमती झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर गुरूवारी दिसला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 296 अंकांच्या वाढीसह 60,067.62 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 87 अंकांच्या वधारासह 17,916 अंकांवर बंद झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर संवत 2078 ची सुरूवात तेजीसह झाली आहे. एक तासासाठी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स व निफ्टी तेजीसह खुले झाले होते. सायंकाळी 6.15 वाजता सेन्सेक्स 60,207.97 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 17,935.05 अंकांवर खुला झाला. दिवाळीचा दिवस हा लक्ष्मी देवीचा असतो. यादिवशी समभाग खरेदी करणे शुभ मानले जाते. यासाठीच लक्ष्मीपूजनादिवशी खास एक तासाचे ट्रेडिंगचे आयोजन होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजीसह बंद झाले तर निफ्टीतील 39 समभाग तेजीसह बंद झाले.