कुपवाड / प्रतिनिधी
सावळीहुन कुपवाड एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी ट्रक व मोटरसायकलची जोराची धडक झाली. मागून येणाऱ्या ट्रकने ठोकरल्याने मोटरसायकलस्वार दिलीप राजाराम सलगरे (५७, रा. सावळी) हे जागीच ठार झाले.
याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी अपघातातील दोन्ही वाहने जप्त करून ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी, मंगळवारी दुपारी मयत दिलीप सलगरे हे एम.एच.१० सी.एस.२२३९ मोपेड स्कूटरवरुन सावळीतून कुपवाडला जात होते. सावळीतील तांबडे मळ्यासमोरुन जात असताना मागून भरधाव येणाऱ्या के.ए.२६ – ए.१३५१ या ट्रकने दुचाकीला ठोकरले. यावेळी सलगरे डांबरी रस्त्यावर जोराने आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कुपवाड पोलिसांनी पंचनामा करुन ट्रक चालकास ताब्यात घेऊन दोन्ही वाहने जप्त केली. आयुष हेल्पलाइन टीमच्या सहकार्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलविला असुन अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.