महाजन यांना पद्मभूषण – जपानच्या माजी पंतप्रधानांचाही गौरव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनात मंगळवारी देखील पद्म पुरस्कारांनी विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या पुत्राने हा पुरस्कार स्वीकारला आहे. तसेच गायिका के. एस. चित्रा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. कर्नाटक जनपद अकॅडमीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर अध्यक्ष मंजम्मा जोगाठी यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींनी सन्मानित केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. लडाखच्या चुंतलिम चोंजोर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चोंजोर हे समाजसेवक असून त्यांनी कारगिलच्या दुर्गम भागातील दोन गावांना जोडण्यासाठी 38 किलोमीटरचा रस्ता एकटय़ाने तयार केला होता. या त्यांच्या प्रेरणादायी अन् अफाट कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून स्वीकारला आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे तसेच मूर्तिकार सुदर्शन साहू यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे, मौलाना वहीदुद्दीन खान, बीबी लाल आणि अमेरिकेतील नरिंदर सिंह कपानी यांनाही पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सोमवारी अनेकांचा गौरव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी विविध राज्यांमधील पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले होते. यादरम्यान माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर एअर मार्शल डॉ. पद्मा बंडोपाध्याय (निवृत्त) यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाकरता पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बांगलादेशातील दोन व्यक्तिमत्त्वांनाही पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.