मागील आठवडय़ात 20 लाख रुग्णांची भर – नेदरलँड्समध्ये 3 आठवडय़ांचे आंशिक लॉकडाउन
वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम
कोरोनाच्या तिसऱया लाटेत वाढत्या रुग्णांमुळे अनेक देशांना पुन्हा कठोर पावले उचलावी लागत आहेत. विशेषकरून युरोपमध्ये कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. पूर्ण युरोपमध्ये मागील 24 तासांमध्ये 3 लाख 3 हजार 662 आणि मागील आठवडय़ात 20 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. नेदरलँड्सने स्थिती बिघडत असल्याचे पाहून शनिवार संध्याकाळपासून 3 आठवडय़ांचे आंशिक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत रेस्टॉरंट आणि अनावश्यक सामग्रीची दुकाने लवकर बंद करावी लागणार आहेत. तर मोठय़ा क्रीडा स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना मज्जाव करण्यात येणार आहे. नेदरलँड्समध्ये मागील 24 तासांमध्ये 16,204 नवे रुग्ण सापडले आहेत.
जर्मनीतही कोरोनाचा कहर वाढला आहे. चालू महिन्यात 7 वेळा उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 50,196 नवे कोरोनाबाधित सापडले होते. तर दिवसभरात जर्मनीत 48,184 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपाययोजना त्वरित न केल्यास डिसेंबरचा महिना अत्यंत खराब ठरू शकतो असे जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टीटय़ूटने देखील लोकांना गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे.
महामारी संपण्याची अपेक्षा नाही
कोरोना लसीचा बुस्टर डोस अवश्य घ्या असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी वृद्ध तसेच कमकुवत इम्युनिटी असलेल्या लोकांना केले आहे. युरोपच्या अनेक भागांमध्ये संक्रमण वाढल्याने धोक्याचे ढग घेंगावू लागले आहेत, याचमुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. ब्रिटिश सरकारला पुढील एक वर्षापर्यंत महामारी संपण्याची अपेक्षा नसल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. तर सर्वात खराब स्थितीमध्ये 2026 पर्यंत लॉकडाउन लागू करण्याची गरज भासू शकते.
युरोपमध्ये पुन्हा संकट
युरोपमध्ये मागील एक आठवडय़ात कोरोनाचे 20 लाख नवे रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण एक आठवडय़ातील सर्वाधिक आहे. तर 27 हजार लोकांना महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. पूर्ण जगात मागील आठवडय़ात पडलेल्या बळींच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्के असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
लसीकरण तरीही संक्रमण वाढते
पूर्व युरोपमधील लसीकरण कमी झालेल्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे पश्चिम युरोपमधील सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांमध्येही बाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत युरोप पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचे मोठे केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.
गरजूंना मिळावी लस
कोरोनाचा बुस्टर डास तंदुरुस्त लोक आणि मुलांना देण्याची गरज नाही. जगातील अनेक देशांमध्ये आजही अनेक आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि जोखिमयुक्त शेणीतील लोकांना लसीचा पहिला डोस देखील मिळालेला नाही. अशा स्थितीत गरज नसलेल्या लोकांना बुस्टर डोस देणे एकप्रकारे घोटाळाच ठरणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
ऑस्ट्रियातही लॉकडाउनची भीती
ऑस्ट्रियामध्ये देखील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अशा स्थितीत लस न घेतलेल्या लोकांना घरातच रोखण्याचा विचार सरकार करत आहे. याचमुळे लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय रविवारी घेतला जाऊ शकतो. ऑस्ट्रियात सध्या केवळ 65 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे.