उचगाव / वार्ताहर
बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया कामगार आघाडीच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी प्रथम पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोकला. त्यानंतर गांधीनगर पोलीसांनी त्यांना हटवल्यानंतर आदोलकांनी पुन्हा कोल्हापुरमध्ये जाणारा रस्ता तावडे हॉटेल चौकात कमानीजवळ एक तास रोखुन धरला. यावेळी शाहुपुरी पोलीस आणि गांधीनगर पोलीसांत हद्दीवरुन शाब्दीक चकमकही झाली. आंदोलकांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस गुणवंत नागटीळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ व शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार सानुग्रह अनुदान मिळावे, मेडिक्लेम योजना सुरु करावी, महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत. स्वतंञ घरकुल योजना सुरु करावी, कोरोना काळात २०००ते ३००० आणि १५०० रुपये अनुदान मिळाले नाही ते त्वरीत द्यावे, कामगारांसाठी असणारी मध्यान्ह भोजन योजना बंद करुन धान्य स्वरुपात मदत मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया कामगार आघाडीच्यावतीने मंगळवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, तावडे हॉटेल येथे रोकण्याचा इशारा दिला होता. पण कामगार कार्यालयाने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या निषेधार्थ बांधकाम कामगार मोठ्या संख्येने तावडे हाँटेल येथे जमा झाले. यामध्ये बांधकाम महिला कामगार सहभागी होत्या. हॉटेल उज्वलदिपकडून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १५ मिनिटांसाठी रोखुन धरला. यावेळी गांधीनगर पोलीसांनी अंदोलकांना महामार्गावरुन हटवत कोल्हापुर शहर कमानीजवळील तावडे हॉटेल चौकात नेले. तिथे अंदोलकांनी एक तास रस्ता रोखुन धरला. यावेळी दोन्ही बाजुला एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. यावेळी रस्ता खुला करण्यासाठी पोलीसांनी केलेली विनंती धुडकावुन लावत आंदोलन सुरुच ठेवल्याने पोलीसांनी गुणवंत नागटीळे यांना उचलुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.
या आंदोलनात प्रदीप मस्के, अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे, रविंद्र पाटील, गणपती कांबळे, पांडुरंग चव्हाण यांचेसह शेकडो आंदोलक सहभागी होते. दरम्यान कामगार आयुक्त कार्यालयातील वरीष्ठ लिपिक एस. एस. थोडगे यांना निवेदन देऊन पंधरा दिवसात अंमलबजावणी न केल्यास तीव्र अंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.