मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांनी अलीकडेच कर्नाटक बँकेसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत टोयोटा कंपनी भारतातील विविध शहरांमध्ये वाहन विक्रीकरिता वित्त सेवा देण्याकरता कर्नाटक बँकेची मदत घेणार आहे.
टोयोटो कंपनी कर्नाटक बँकेमार्फत वाहन खरेदीसाठी ग्राहकांना कर्जाची व्यवस्था करणार आहे. कंपनीने यासंदर्भात नुकताच कर्नाटक बँकेसोबत एक सहकार्याचा करार केला आहे. या अंतर्गत सर्व प्रकारातील वाहने कर्जाच्या माध्यमातून बँकेतर्फे ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत असे समजते. आकर्षक व्याजदराचा पर्याय बँकेतर्फे दिला जाणार आहे. खासगी आणि व्यावसायिक वापराकरीताच्या वाहनांकरीताही कर्जाची सुविधा असणार आहे. मेट्रोसह इतर छोटय़ा शहरांमध्ये पोहचून जास्तीत जास्त वाहन विक्री करण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाणार असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने म्हटले आहे.