ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीतील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दोन मुली कृतिका रावत आणि तारिणी रावत यांनी त्यांच्या आई-वडिलांना मुखाग्नी दिला तसेच त्यांना यावेळी १७ तोफांची सलामी ही देण्यात आली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
बिपिन रावत मूळचे उत्तराखंडचे रहिवासी तर त्यांच्या पत्नी मधुलिका रावत मध्य प्रदेशातील होत. दोघांनीही आपापल्या मूळ ठिकाणांशी घट्ट नातं जपलं होते. बिपीन रावत यांनी 2018 मध्ये त्यांच्या मूळ गावी सायनाला भेट दिली होती. आणि त्यांनी आपल्या काकांना सांगितले की त्यांना एक घर बांधायचे आहे आणि तिथे स्थायिक व्हायचे आहे. त्यांचे काका भरतसिंग रावत यांनी सांगितल्याप्रमाणे, बिपिन रावत यांनी त्यांना सुमारे महिनाभरापूर्वी फोन केला आणि गावातील रस्त्यांबाबत विचारणा ही केली होती.
बिपिन रावत यांचे मेहुणे यशवर्धन सिंग यांना पुढील वर्षी जानेवारीमध्ये मध्य प्रदेशातील शहडोलला भेट देण्याचे वचन दिले होते. तसेच जिल्ह्यात सैनिक शाळा काढण्याची योजना ही आखली होती. मात्र काळाला हे मान्य नसल्याने यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, मधुलिका यांच्या भावाने सांगितले की ते उद्या ११ डिसेंबर रोजी सकाळी अस्थिकलश उचलतील आणि हरिद्वारला जातील जिथुन अस्थिकलश पवित्र गंगेत विसर्जित केले जातील. असे जनरल रावत यांचे मेहुणे यशवर्धन सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.