प्रतिनिधी / कोल्हापूर
कळे नजिक हरपवडे ता.पन्हाळा येथे मातीच्या गाळात अडकलेल्या मादी गवा रेडीला वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत गाळातून बाहेर काढत जीवदान दिले होते. दरम्यान, या जखमी गव्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान या गव्याचा मृत्यू झाला.
हरपवडे येथे यावर्षीच्या अतिवृष्टीत डोंगर खचून गुरवाचा नाळवा नावाचे शेत गाळाने गाढले आहे. याच शेतात शनिवारी पहाटे मादी गवा रेडी अन्नाच्या शोधात असताना फसल्याने गाळात अडकली असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. लागलीच ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली.
त्यामुळे बाजार भोगाव वन परीक्षेत्र पणुत्रे बीटचे वनपाल नाथा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली हा गवा मादीस गाळातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे प्रयत्न करण्यात आला. मात्र गाळात जेसीबी चालू न शकल्याने अखेर ग्रामस्थांच्या मदतीने गवा मादीस दोरखंड लावून ओढून बाहेर काढण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसापासून वन विभागाचे डॉ.वाळवेकर व जिल्हा परिषदेचे डॉ.कांबळे मादीवर उपचार करत होते. गाळात अडकल्यामुळे या गावाला उठता येत नव्हते. गेल्या चार दिवसांपासून तो बसुन होता. त्याची मलमूत्र प्रक्रिया नीट होऊ शकत नव्हती. तसेच पोट साफ होत नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरीच्या काळात या गव्याने उपचाराला प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हालचाल होत नसल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन या गव्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.