एस. आर. पाटील यांची सभागृहात मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकशाहीमार्गाने आम्ही मोर्चा काढून येत होतो. ट्रक्टरमधून येत असताना आमचा ट्रक्टर गेटवर अडविण्यात आला. मी विधानपरिषद विरोधी पक्षनेता आहे, त्यामुळे ट्रक्टरमधूनच सुवर्णसौधमध्ये जाणार असे सांगितले. मात्र पोलिसांनी मला अडवून ठेवले. त्यामुळे सभागृहात यायला उशीर झाला. वेळ आणि खर्च वाया गेला आहे. याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत. तेव्हा त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी केली.
आम्ही ट्रक्टरमधून येवू किंवा छकडी वाहनातून येवू त्याच्याशी पोलिसांचा काय संबंध, ट्रक्टर चालकाचा परवाना नाही म्हणून अडविल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र ट्रक्टर चालविण्यासाठी परवाना लागतो काय? शेतकऱयाला जर अशाप्रकारे अडविले जात असेल तर देशाची अवस्था गंभीर होईल, हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ज्यांनी अडविले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर सभापती बसवराज होरट्टी यांनी तुम्हाला अडविल्याचे आम्हाला सांगण्यात आल्यानंतर आम्ही तातडीने पोलिसांना सूचना केली होती. जी चूक झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत सभागृहाचे कामकाज चालविण्यास सहकार्य करा, असे आवाहन केले. एकूणच पहिल्या सत्रामध्ये विधानपरिषदचे कामकाज वारंवार स्थगित झाले.