57 पैकी 24 देशांनी स्वीकारले निमंत्रण : इस्लामाबादमध्ये 3 दिवस मोबाइल सेवा बंद
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी)ची परिषद शनिवारपासून सुरू झाली आहे. मुख्य बैठक 19 डिसेंबर रोजी होणार असून सौदी अरेबिया याचे अध्यक्षत्व करणार आहे. 57 मुस्लीम देश ओआयसीचे सदस्य असले तरीही आतापर्यंत केवळ 24 देशांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे.
परिषदेत केवळ संबंधित देशांचेच विदेशमंत्री सामील होतील. 5 आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सुरक्षेकरता इस्लामाबादमध्ये शुक्रवारपासून रविवारपर्यंत फोन अन् मोबाइल सेवा बंद करण्यात आली. पाक सरकारने 18 अन् 19 डिसेंबर रोजी शासकीय सुटीच घोषित केली आहे.
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला मान्यता मिळवून देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. ओआयसीच्या बैठकीत तालिबानला निमंत्रित करण्यात आले आहे. याचमुळे अनेक देश या परिषदेत सामील होण्यास टाळाटाळ करत आहेत. पाकिस्तानात सदैव दहशतवादी हल्ल्यांचा धोका असतो. याचमुळे परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे.