कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाची विविध सुविधा पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळ, बेरोजगारी, जीएसटी, नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे विणकर व्यावसायिक थंडावले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाविना व्यापार आणि विक्री थांबली आहे. त्यामुळे विणकर व्यवसाय अडचणीत सापडला असून शासनाने विणकर व्यवसायाला सुविधा पुरवून किमान 1 हजार कोटी राखीव निधी ठेवावा, अशी मागणी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाने मंगळवारी विधानसौधसमोर आंदोलनाद्वारे केली.
शेतकरी व विणकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शासनाच्या पुरेशा सुविधांअभावी राज्यातील विणकर व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. लॉकडाऊन काळात संपूर्ण व्यवसायच ठप्प झाल्याने विणकरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने विणकरांच्या व्यवसायासाठी राखीव निधी उपलब्ध करून द्यावा. याबरोबरच विणकर समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ा मागासला आहे. याकरिता विविध सुविधा पुरविणे, कर्जपुरवठा करणे, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे आदी मागण्या विणकर व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे केल्या.