सार्वजनिक ठिकाणी 50 टक्के उपस्थिती मर्यादा, नाईट कर्फ्यूला मुदतवाढ : बेंगळुरात सेमी लॉकडाऊन : नवी मार्गसूची 19 पर्यंत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने येत्या शुक्रवारी रात्रीपासूनच सोमवारी सकाळपर्यंत विकेंड कर्फ्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. सध्या नाईट कर्फ्यू जारी असून त्याचा कालावधी देखील आणखी दोन आठवडय़ांनी वाढविण्यात आला आहे. विकेंड कर्फ्यू वगळता उर्वरित दिवशी सार्वजनिक ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आली आहे. बुधवारपासून ही मार्गसूची जारी होत असून ती 19 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी सायंकाळी 6ः30 वाजता बेंगळुरात कोविड टास्कफोर्सच्या तज्ञांची बैठक झाली. सुमारे अडीच तासहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत राज्यात जारी करण्यासंबंधीचे कठोर नियमांसह अनेक मुद्दय़ांवर विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर रात्रीच सरकारने मार्गसूची प्रसिद्ध केली. त्यानुसार बेंगळूरसह संपूर्ण राज्यात येत्या शुक्रवारी रात्री 10 पासून सोमवारी पहाटे 5 पर्यंत विकेंड कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. या कालावधीत किराणा, मांसविक्री, दूधविक्री, भाजीपाला, फळेविक्री, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहतील. मालवाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. उर्वरित सर्व प्रकारची आस्थापने बंद राहणार आहेत. तर बार-रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
त्याचप्रमाणे 19 जानेवारीपर्यंत सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच बार, पब, जीम, मॉल, हॉटेल, स्वीमिंग पूल, चित्रपटगृहांमध्ये क्षमतेच्या 50 टक्के जणांनाच प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे. शिवाय येथे प्रवेश करणाऱयांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. मंदिरे, मशिद, चर्च व इतर धार्मिक स्थळी तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणाऱया सभागृहांमध्ये देखील क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र, विकेंड कर्फ्यू कालावधीत जीम, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, मॉल, उद्याने तसेच इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
19 जानेवारीपर्यंत मोर्चे, निदर्शने, धरणे आंदोलन, जत्रा यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवडे कोणत्याही पक्षाला अथवा लोकांना राज्यात निदर्शने, मोर्चे काढण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाचा फैलाव दुप्पट वेगाने होत असल्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
विकेंड कर्फ्यू कालावधीत कारखाने, कंपन्या सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून येथील कामगारांना ये-जा करण्यासाठी संबंधीत कंपनीचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच ई-कॉमर्सशी संबंधीत सेवाही सुरू राहणार आहेत. प्रवासी वाहतूक सुरू राहणार असली तरी प्रवाशांना स्वतःजवळ प्रवासाचे तिकीट बाळगणे गरजेचे आहे.
विवाह कार्यक्रमाच्या उपस्थितीवर मर्यादा
खुल्या मैदानावर किंवा मोकळय़ा जागेवरील आयोजित विवाह समारंभांमध्ये कमाल 200 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. तर बंदीस्त असणाऱया हॉलमधील विवाह समारंभांमध्ये 100 पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार आहे. विवाह समारंभांमध्ये सहभागी होणाऱयांना कोरोना प्रतिबंक लसीचे दोन डोस सक्तीचे असणार आहेत.
विदेशातून येणाऱयांसाठी नियम कडक
विदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने अधिक प्रभावित असलेल्या ‘हाय रिस्क’ देशांमधून राज्यात येणाऱयांना विमानतळांवरच कोविड चाचणी करून हॉटेलमध्ये क्वारंटाईन (संस्थात्मक क्वारंटाईन) करण्यात येणार आहे. तयाकरिता येणारा खर्च प्रवाशांनाच भरावा लागणार आहे.
बेंगळूरमध्ये शाळा बंद
मंगळवारी राज्यात बेंगळूरसाठी स्वतंत्र नियमावली जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारपासून केवळ बेंगळूरमधील दहावी, बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा महाविद्यालये दोन आठवडय़ापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे. मेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालये मात्र, नेहमीप्रमाणे सुरू राहतील. बेंगळूरमधील बसेस आणि मेट्रो रेल्वेमध्ये आसनाइतक्याच प्रवाशांना प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे.
गोव्यातून येणाऱयांनाही आरटीपीसीआर सक्ती
केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची यापूर्वीपासूनच सक्ती आहे. त्यासाठी या दोन्ही राज्यांच्या सीमेवर चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. आता गोव्यातून कर्नाटकात येणाऱयांनाही आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गोव्याच्या सीमेवर
विकेंड कर्फ्यू कालावधीत…
किराणा, मांसविक्री, दूध, भाजी, फळे विक्रीला मुभा
बार-रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा
मालवाहतुकीलाही पूर्णपणे मुभा
हॉस्पिटल, मेडिकल नेहमीप्रमाणे सुरूच
सरकारी कार्यालये शनिवारी बंद
कंपन्या, कारखाने सुरू
नियोजित विवाह समारंभांना परवानगी
दोन आठवडय़ांसाठी…
सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू
मोर्चे, निदर्शने, आंदोलनावर बंदी
हॉटेल, चित्रपटगृहे, मॉलमध्ये 50 टक्के उपस्थिती मर्यादा
सर्व धार्मिक स्थळांमध्ये क्षमतेपेक्षा 50 टक्के लोकांना प्रवेश
विवाह समारंभात सहभागी होणाऱयांना लसीचे दोन डोससक्ती
सर्व सरकारी कार्यालये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू