प्रतिनिधी/ सातारा
शासनाच्या आदेशानुसार सोमवार पासुन 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सोमवार पासुन सुरूवात झाली आहे. जिल्हय़ात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असुन पहिल्याच दिवशी 11 हजार 781 विद्यार्थी लसवंत झाले आहे. अद्याप ही 1 लाख 48 हजार 12 विद्यार्थ्यांची लस घेणे बाकी आहे. सदर लसीकरण मोहिम शंभर टक्के पुर्ण होण्याकरीता जिल्हा रूग्णालयासह सर्व उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्रात याचबरोबर काही शाळा महाविद्यालयांमध्ये सदर लसीकरण मोहिम पार पडली. लसीकरण बाबतची जनजागृती शिक्षण विभागातर्फे ही करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य विभागातर्फे आयोजित केलेल्या केंद्रांमध्ये प्रति सोमवार व शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. सदरची लसीकरण मोहिम पार पडणार आहे. सध्या सर्व पालक व विद्यार्थ्यांमध्ये लसीकरणा बाबतची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अनेक शाळेतील शिक्षक वर्गांतर्फे ही विद्यार्थ्यांना लसीकरण करून् घेण्याबाबत सांगण्यात येत आहे. आणि लसीकरण करून घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदही करून घेण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी जिल्हय़ातील 187 ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या केंद्रांवर एकुण 11 हजार 781 युवकांनी लसीकरण करून घेतले. या सर्व युवा पिढीला कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली. सोमवारी शासकीय रूग्णालयात या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद लाभल्याने येत्या काही दिवसात 100 टक्के लसीकरणाचा टप्पा जिल्हा पुर्ण अशी आशा ही आरोग्य विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.