मुंबई / प्रतिनिधी
कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच राजकिय मंडळींनासुद्धा लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना देखील
कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे. डॉ. भारती पवार यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. भारती पवार सलग दोन दिवस नाशिक-मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली.
खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार हे दोघेही सलग दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असतानाच खासदार गोडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज भारती पवार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.