नवी दिल्ली
भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात भर टाकणाऱया राफेल लढाऊ विमानांच्या पुरवठय़ावरून नवी माहिती समोर आली आहे. आणखीन 3 राफेल लढाऊ विमानांची खेप 1 किंवा 2 फेब्रुवारी रोजी भारतात पोहोचणार आहे. या विमानांमध्ये भारताच्या गरजा पाहता महत्त्वाची उपकरणे बसविण्यात आली आहेत. या विमानांच्या मदतीने शत्रूंशी लढण्यास मोठी मदत मिळणार आहे. अखेरची राफेल लढाऊ विमाने एप्रिल महिन्यात भारतात पाठविली जाऊ शकतात.
दक्षिण फ्रान्सच्या मार्सेली येथील इस्र ली टय़ूब वायुतळावरून 3 राफेल विमानांना भारतासाठी रवाना केले जाणार आहे. फ्रान्स ते भारत या प्रवासादरम्यान संयुक्त अरब अमिरातकडून आकाशातच एअरबस मल्टीरोल ट्रान्सपोर्ट टँकर्सकडून इंधन भरले जाणार आहे. राफेल करारातील अखेरचे विमान एप्रिल महिन्यात भारतात पोहोचणार आहे. याच विमानाचा भारतीय वायुसैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापर करण्यात आला होता.