प्रतिनिधी /बेळगाव
इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱयांसाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. आता 15 मार्चपर्यंत करदात्यांना रिटर्न फाईल अपलोड करता येईल. मुदतवाढ देण्यात आली असली तरी सर्व्हरमध्ये येणाऱया समस्या कायमच्या दूर करून करदात्यांना कर भरणे सोयीचे व्हावे, अशी मागणी बेळगाव परिसरातील व्यापाऱयांनी केली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. परंतु टॅक्स रिटर्न फाईल इन्कम टॅक्स विभागाच्या सर्व्हरवर अपलोड करताना सर्व्हरडाऊनची समस्या येत होती. एक फाईल अपलोड करताना दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता. काहीवेळा भरलेली फाईल तेथेच थांबून पुन्हा नव्याने भरावी लागत होती. यासह इतर तांत्रिक दोष या सर्व्हरमुळे करदात्यांना सहन करावे लागत होते. रिटर्न फाईल वेळेत जमा न झाल्यास दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा इन्कम टॅक्स विभागाने दिला होता. जर सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड असेल तर वेळेत फाईल अपलोड कशी करणार? असा प्रश्न करदात्यांसमोर होता.
त्यामुळे इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी करदाते तसेच व्यापारी करीत होते. बेळगाव परिसरात हजारो करदाते असून त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जमा करावी लागते. परंतु सर्व्हरच्या समस्येने करदात्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर केंद्र सरकारने या करदात्यांना 15 मार्चपर्यंत मुदत वाढ करून दिलासा दिला आहे. केंदीय प्रत्यक्ष कर मंडळाने याची घोषणा केली आहे. सर्व्हरच्या नामुष्कीमुळे इन्कम टॅक्स विभागाने तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. उद्योग तसेच व्यापार यांचे ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठीची मुदतही 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व्हरमध्ये कायमस्वरुपी सुधारणा करा
इन्कम टॅक्स विभागाने मुदतवाढ दिल्यामुळे करदात्यांना तात्पुरत्या स्वरुपात दिलासा मिळाला आहे. परंतु कर भरणे ही प्रक्रिया सुलभ व्हायची असेल तर सर्व्हरमध्ये कायमस्वरुपी सुधारणा आणणे आवश्यक आहे. फाईलची साईज मोठी असली तरी केंद्र सरकारने तशा पद्धतीने सर्व्हरची व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे केल्यास यापुढील काळात केंद्र सरकारलाही मुदतवाढ देण्याची गरज भासणार नाही.
– सतीश तेंडोलकर (अध्यक्ष-बेळगाव टेडर्स फोरम)