वेलिंग्टन / वृत्तसंस्था
पॅसिफिक महासागरातील टोंगा या देशात ज्वालामुखीचा उदेक झाल्यानंतर आलेल्या त्सुनामीने मोठा विध्वंस केला आहे. त्सुनामीमुळे संपूर्ण देशाची दळणवळण व्यवस्था उद्ध्वस्त झाली. टेलिफोन लाईन्स आणि इंटरनेट कनेक्शन सेवा अजूनही पूर्ववत झाली नसल्यामुळे टोंगावासियांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या जीवितहानीबाबतही अधिक माहिती मिळालेली नाही. शनिवारी टोंगाजवळ समुद्राखाली ज्वालामुखीचा उदेक झाला. यामुळे त्सुनामीच्या 1.2 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला होता. टोंगाबरोबरच दक्षिण पॅसिफिकमधील अनेक बेटांसाठी इशारा देण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधून टोंगाच्या किनारी भागात प्रचंड विध्वंस झाल्याचे दिसून येत आहे. समुद्राजवळ बांधलेली घरे पूर्णपणे तुटलेली आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डर्न यांनी टोंगामधील स्थितीबाबत शोक व्यक्त केला आहे. टोंगा हा देश न्यूझीलंडच्या ईशान्येस 2,383 किलोमीटर (1,481 मैल) अंतरावर आहे. या देशातील अनेक बेटांवर एकूण 1 लाख 5 हजार लोक राहतात.