सौदी आघाडी सैन्याचा हवाई हल्ला : हूती बंडखोर लक्ष्य : युएईतींल ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / सना
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील हूती बंडखोरांच्या विरोधात कारवाई केली आहे. आघाडीच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी येमेनची राजधानी सना येथील हूती तळांवर बॉम्बचा वर्षाव केला आहे. या बंडखोरांनी सोमवारी संयुक्त अरब अमिरातची (युएई) राजधानी अबूधाबीवर ड्रोन हल्ला केला होता. अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमान आणि तेल डेपोनजीक करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 भारतीयांसह 3 जणांचा मृत्यू झाला होता.
सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी सैन्य आणि हूती बंडखोरांच्या दरम्यान दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची सुरुवात 2015 मध्ये हूती बंडखोरांकडून येमेनची राजधानी सनावर कब्जा करण्यात आल्यावर झाली होती. सौदी आघाडी सैन्याने चालू वर्षात हूतींच्या विरोधात कारवाई केली होती. त्यानंतर बंडखोर आणि अरब देशांमध्ये वार-प्रतिवार सुरू झाला आहे.
हूती बंडखोर म्हणजे कोण?
शिया मुस्लीम असलेल्या हूती बंडखोरांचा उत्तर येमेनच्या बहुतांश हिस्स्यांवर कब्जा आहे. 2015 मध्ये येमेनची राजधानी सनावर हूती बंडखोरांचा कब्जा झाल्यावर अध्यक्ष अब्दरबू मंसूर हादी यांना देश सोडावा लागला होता. हादी यांना सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. येमेनमधील सैन्याचा एक गट देखील बंडखोरांच्या बाजूने असल्याचे मानले जाते. या बंडखोरांना इराणचे पाठबळ प्राप्त आहे.
इराण अन् सौदी संघर्ष
इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात इस्लामी जगताच्या नेतृत्वावरून चढाओढ आहे. इराण या बंडखोरांच्या मदतीने येमेनमध्ये शिया सरकार स्थापन करू पाहत आहे. तर सुन्नी विचारसरणी मानणारा सौदी अरेबिया त्यांना रोखू पाहत आहे. सप्टेंबर 2019 मध्ये हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दोन तेलशुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केल्याने जगभरातील कच्चे तेल पुरवठय़ावर परिणाम झाला होता. येमेनमधील संघर्षात आतापर्यंत 70 हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागल्याचे मानले जाते.
अबूधाबीमधील हल्ला
अबुधाबी येथे सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल कंपनीच्या गोदामानजीक इंधन टँकर्समध्ये स्फोट झाला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आग लागल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. प्रारंभिक तपासात छोटय़ा विमानाचे काही तुकडे मिळाले आहेत. ते ड्रोनचे असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात फार नुकसान झाले नसल्याचे पोलिसांकडून म्हटले गेले.