सावंतवाडी/ प्रतिनिधी-
कोरोना ची तिसरी लाट येणार म्हणून एक जानेवारीपासून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राज्यात सर्वत्र शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानंतर आता येत्या 31 जानेवारीपासून पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व इयत्तेतील शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेतील शिक्षकांना येत्या 30 जानेवारी पूर्वी rt-pcr टेस्ट रिपोर्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे, असा फतवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी काढला आहे. राज्यात सर्वत्र 24 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे धोरण शिक्षण विभागाने व राज्य सरकारने घेतले. त्यावेळी rt-pcr टेस्ट संदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठलेही बंधन घालण्यात आले नव्हते, असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला शिक्षकांची rt-pcr टेस्ट करून नंतरच शाळा सुरू करण्याच्या धोरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटना कडून तीव्र विरोध होत आहे.