17 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, चौकशी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
नेहरुनगर येथील केपीटीसीएल एम्पलॉईज को-ऑप. पेडिट सोसायटीत सव्वा तीन कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी माजी अध्यक्षासह 17 जणांविरुद्ध येथील सीईएन पोलीस स्थानकात फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांत एकच खळबळ माजली आहे.
रविवार दि. 30 जानेवारी रोजी संस्थेचे विद्यमान सचिव सुरेश हणमंत वड्डर यांनी येथील सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सोसायटीचे माजी अध्यक्ष नाथाजी पिराजी पाटील (रा. वैभवनगर), माजी सचिव महेश भावकाण्णा पाटील यांच्यासह 17 जणांवर भा.दं.वि. 406, 408, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. एकूण 3 कोटी 27 लाख 75 हजार 958 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अलीकडेच झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत नव्या संचालक मंडळांची निवड झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
मृत व्यक्तीच्या नावे कर्जाची 30 खाती
1 जून 2015 ते 18 ऑक्टोबर 2020 याकाळात हा गैरव्यवहार झाला असून नागराजप्पा या मृत व्यक्तीच्या नावे कर्जाची 30 खाती उघडून हा गैरव्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्नाटक सहकार संघ कायदा 1959 च्या कलम 64 अन्वये या गैरव्यवहाराची चौकशी झाली आहे. 2 कोटी 72 लाख 56 हजार 470 रुपयांचा दुरुपयोग झाला असून त्याच्या व्याजासहीत 3 कोटी 27 लाख 75 हजार 958 रुपयांचा गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी अध्यक्ष नाथाजी पिराजी पाटील (वैभवनगर), माजी सचिव महेश भावकाण्णा पाटील (माळमारुती), माजी उपाध्यक्ष प्रवीणकुमार चिकडे (हेस्कॉम ग्रामीण विभाग), माजी संचालक सुरेश कल्लाप्पा कांबळे ( हेस्कॉम ग्रामीण विभाग), सुरेश कोलकार (साहाय्यक कार्यकारी अभियंता, होसकोटे-बेंगळूर ग्रामीण), अजित एम. पुजेरी (रामतीर्थनगर), मल्लसर्ज शहापूरकर (काकती), विलास शांताराम पावशे (हिंडलगा), सुभाष मल्लाप्पा हळोळ्ळी (ग्रामीण विभाग, क्रमांक 2), एस. वनथन (शहर उपविभाग क्रमांक-4), हणमंत पाटील (वैभवनगर), हणमंत बी. पाटील (हेस्कॉम खानापूर-उपविभाग), द्राक्षायणी नेसर्गी (जक्कीनहोंडाजवळ), गायत्री के. आर. (नेहरुनगर), शिल्पा चव्हाण (उपविभाग-2, रेल्वे स्टेशनजवळ), बी. एल. गोडलकुंदरगी (ग्रामीण विभाग, गांधीनगर), राजेंद्रकुमार बी. हळींगळी (220 के. व्ही. स्टेशन-इंडाल) या 17 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.