पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन:भविष्यात राष्ट्र घडविणारी आहे सध्याची युवा पिढी
@वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदींनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसंबंधी एका वेबिनारला संबोधित केले आहे. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी निगडित 5 गोष्टींवर अत्यंत भर देण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याकडे सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले.
आमच्या शिक्षण व्यवस्थेचा विस्तार व्हावा, त्याची गुणवत्ता सुधारावी आणि शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढावी याकरता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशात डिजिटल स्कीलिंग व्यवस्था निर्माण व्हावी, उद्योगक्षेत्राच्या मागणीनुसार कौशल्य विकास व्हावा याकडे लक्ष देण्यात आले आहे. भारताचा जुना अनुभव आणि ज्ञान सध्याच्या शिक्षणात सामील करण्याचा प्रयत्न आहे. भारतात जागतिक दर्जाची विदेशी विद्यापीठे यावीत यानुसार पावले उचलण्यात आली आहेत. ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या सर्व क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अपार संधी असून ही एक अत्यंत मोठी जागतिक बाजारपेठ असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
सध्याची युवा पिढी देशाच्या भविष्याची कर्णधार असून भविष्यातील राष्ट्राची निर्माती देखील आहे. सध्याच्या युवा पिढीला सशक्त करण्याचा अर्थ भारताच्या भविष्याला सशक्त करणे आहे. याच विचारासह 2022 च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील 5 गोष्टींवर भर देण्यात आला आहे. ई-विद्या, वन क्लास वन चॅनेल, डिजिटल लॅब्स, डिजिटल विद्यापीठ या सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. भारताच्या सामाजिक-आर्थिक रचनेत गाव, गरीब, दलित, मागास, आदिवासी सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.
नॅशनल डिजिटल विद्यापीठ
नॅशनल डिजिटल विद्यापीठ भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अनोखे आणि अभूतपूर्व पाऊल आहे. डिजिटल विद्यापीठात आमच्या देशातील जागांची समस्या पूर्णपणे समाप्त करू शकते. आजचा दिवस (सोमवार) मातृभाषा दिन देखील आहे. मातृभाषेत शिक्षण मुलांच्या मानसिक विकासाशी निगडित आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण सुरू झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.