प्रतिनिधी /फोंडा
शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होते. मात्र कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालखंडानंतर तब्बल दोन वर्षांनी शाळेचा पहिला दिवस उजाडला. फोंडा तालुक्यातील सरकारी व खासगी शाळांमध्ये खूप दिवसानंतर मुलांची किलबिल ऐकू आली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत बहुतेक सरकारी शाळांमध्ये काल प्रत्यक्ष वर्ग भरले. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सोडल्यास कालचा दिवस शाळेचा पहिला दिवस ठरला. या मुलांनी पहिल्यांदाच हा वेगळा माहोल अनुभवला.
फोंडा तालुक्यात 103 सरकारी प्राथमिक शाळा असून चाळीसहून अधिक सरकारी व खासगी माध्यमिक शाळा आहेत. एकदोन मोठय़ा शाळा सोडल्यास बहुतेक शाळांमध्ये सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांना बोलावून पूर्णवेळ वर्ग भरविण्यात आले. काही शाळांनी मुलांना फुले देऊन तर काही ठिकाणी सजावट करून मुलांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पालक व शिक्षकांच्या चेहऱयावरील ताण थोडासा हलका होऊन शाळा सुरु झाल्याचा आनंद दिसत होता. कवळे येथील सरस्वती प्राथमिक व हायस्कूलमध्ये मुलांची पारंपारिक पद्धतीने ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. तर बाराजण उसगांव प्राथमिक शाळेत फुग्यांच्या कमानी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर फोंडा सरकारी प्राथमिक शाळेमध्ये पालक व विद्यार्थ्यांसोबत मातृभाषादिन साजरा करण्यात आला व त्यानंतर वर्ग भरविण्यात आले. सर्व शाळांमध्ये कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. मुलांना गणवेश सक्तीचा नसल्याने रंगीबेरंगी पेहरावात मुलांनी हा पहिला दिवस आनंदात घालवला.
माध्यमिक शाळांमध्ये सन् 2020 मध्ये सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच हायस्कूलमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण घेण्याचा अनुभव घेतला. इयत्ता नववी व दहावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले होते. मात्र पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने हा हायस्कूलचा पहिलाच दिवस ठरला. शहरातील काही मोठय़ा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जादा असल्याने त्यांना एका दिवसा आड आलटूनपालटून वर्ग सुरु करण्यात आले आहेत.