सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांनी कोविड 19 संबंधाने मार्गदर्शक सूचनांचे, कोविड अनुरुप वर्तणूकीचे काटेकोरपणे पालन करून उपलब्ध पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था व इतर उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध असल्यास ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबत त्यांच्यास्तरावर निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.
या आदेशात म्हटले आहे. सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांचे हिताचे राहील. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दि. 25 जानेवारी 2022 चे परिपत्रक व कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्निक महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्याअर्थी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील महाविद्यालयातील नियमित वर्ग पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून दि. 1 मार्च 2022 पासून सुरू करण्यास आदेश निर्गमित करीत आहे.