वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांप्रती ग्राहकांचा कल वाढताना दिसून येत आहे. विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी कंपन्यांकडे ग्राहकांची विचारपूस गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. वाढती मागणी लक्षात घेता येणाऱया 3 वर्षात इ-स्कूटर्सच्या किंमती 45 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे सांगितले जाते.
अलीकडे मागणी वाढल्याने इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपन्यांच्या उत्पन्नामध्येही वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. जॉय ई बाईक नावाने दुचाकी बनवणाऱया वार्डविझार्डने फेब्रुवारी 2022 मध्ये 4 हजार 450 इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2021 च्या तुलनेमध्ये 1290 टक्के विक्री अधिक आहे.
45 हजारपर्यंत किमत वाढणार
महागाई आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ या कारणास्तव अनेक जण इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. एकंदर मागणीचा वाढता कल लक्षात घेता पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किमती या 45हजार रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज क्रिसिल या संस्थेने नुकताच व्यक्त केला आहे.
पर्यावरणाप्रति ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होत असून इ-स्कूटर्सची मागणीही वाढली आहे. 2025 पर्यंत स्कूटर्सच्या किमती 45 हजार रुपयापर्यंत वाढू शकतात. ज्याची भरपाई वाहनांसाठी असलेल्या उत्पादन प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) केली जाऊ शकते. विविध मॉडेल्सची उपलब्धतता, घरातही चार्जिंगची सहज सुविधा यामुळेच अनेकांचा कल दुचाकी घेण्याकडे जास्त दिसतो आहे.
नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशनअंतर्गत फेम 2 योजना आणि विविध राज्यांच्यावतीने दिले जाणारे अनुदान यामुळेच दुचाकीच्या विक्रीमध्ये वाढ दिसली आहे. फेमच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 60-65 टक्के तुलनेमध्ये हे अनुदान दुसऱया टप्प्यामध्ये 85 टक्केपर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे हिरो इलेक्ट्रिकने भारतामध्ये आपली पहिली लिथियम आयन आधारीत स्कूटर विकसित केली आहे. कंपनीने आतापर्यंत साडेचार लाख इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. 2020 पेक्षा 2021 मध्ये अति जलद व कमी जलद सहीत इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री 132 टक्के वाढलेली दिसली आहे.