ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, असं अजिच पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पाच ट्रिलियननंतर आता एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची चर्चा होणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विकासाच्या पंचसूत्रीवर सरकार काम करणार असल्याचं नमूद केलं. यामध्ये कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव कामगिरी करून त्यांचा विकास साध्य करण्याचं धोरण राज्यानं ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था
दरम्यान, यावेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलं. “राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल”, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.