भाजपने दिला सल्ला
प्रतिनिधी / मडगाव
मतमोजणी होऊन आठवडा उलटला तरी भाजप सरकार स्थापन करू शकत नसल्याने काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली होती. यावेळी भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला होता. त्याला भाजपने प्रतिउत्तर देताना काँग्रेसने सत्तास्थापनची स्वप्ने पाहू नये, असा सल्ला काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाने अगोदर आपल्या विधिमंडळ नेत्याची निवड करावी तसेच प्रदेश अध्यक्षाची निवड करावी असे उर्फान मुल्ला म्हणाले. काँग्रेस पक्षाची पूर्ण वाताहात झाली असून या पक्षाला विरोधात बसण्याची संधी गोव्यातील मतदारांनी दिली आहे. या संधीचा लाभ त्यांनी घ्यावा, असेही मुल्ला म्हणाले.
दिगंबर कामत भाजपच्या संपर्कात
सत्तेसाठी काँग्रेसचे ज्ये÷ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये येण्याच्या प्रयत्नात असून ते केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी उर्फान मुल्ला यांनी केला. आपल्या जवळच्या समर्थकांना बोलावून त्यांनी तशी कल्पना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एका बाजूने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे व दुसऱया बाजूने सत्तास्थापन करण्याची भाषा बोलणे हे कितपत योग्य, असा सवालही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे तसेच केतन कुरतरकर उपस्थित होते.