प्रतिनिधी/ सातारा
शिवथर (ता. सातारा) हद्दीत सातारा-फलटण रस्त्यावर चार चाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकी स्वार सागर पुरुषोत्तम कदम (वय 27 रा. देऊर ता. कोरेगाव) जागीच ठार झाला. याची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवथर हद्दीत सातारा-फलटण रस्त्यावर काठवाडीचा ओढा या ठिकाणी चारचाकी टाटा नेक्सान (एमएच 16 सीवाय 2772) गाडी फलटणवरून साताराकडे जात असताना दुचाकीवरुन सागर पुरुषोत्तम कदम घरी जात असताना समोरून येणाऱया चार चाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात सागर जोरदा जागीच ठार झाला आहे.
सातारा ते वाठार रस्ता सुस्थितीत असल्याने वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ चालू असते. तसेच भरधाव वेगाने वाहन चालक गाडी चालवत असतात, त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. शिवथर हद्दीतील अपघाताची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे.