पेट्रोल 50, डिझेल 55 पैशांनी महाग ः 3.70 ते 3.75 रुपयांची दरवाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल कंपन्यांनी या आठवडय़ात पाचव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रविवारी पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागले. नवी किंमत लागू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 99.11 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 90.42 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. देशभरात दरामध्ये ठराविक वाढ करण्यात आली असली तरी स्थानिक कर आकारणीनुसार वेगवेगळय़ा राज्यानुसार दरात फरक दिसून येत आहे. यापूर्वी 22, 23, 25 आणि 26 मार्च रोजी इंधनदरात दररोज 80 ते 85 पैशांची वाढ झाली होती. सहा दिवसांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 3.70 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.75 रुपयांनी वाढले आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महागाईबद्दल सरकारवर टीका केली आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतवाढीमुळे सामान्य माणसावर बोजा वाढल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.
मार्च महिन्यात गेल्या सहा दिवसांपासून इंधन दराचा भडका सुरू आहे. 22 मार्चपासून आतापर्यंत एलपीजी आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. 27 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाचव्यांदा 50 ते 55 पैसे वाढ झाली. त्यापूर्वी 26 मार्च आणि 25 मार्च रोजी दोन्ही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली होती. 24 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली नसली तरी सीएनजी-पीएनजीच्या किमती 1 रुपयांपर्यंत महागल्या होत्या. त्यापूर्वी 23 मार्च रोजी दुसऱयांदा आणि 22 मार्च रोजी सर्वप्रथम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तसेच घरगुती गॅसच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ
कच्च्या तेलाच्या किमती 137 दिवसांच्या अंतरात सुमारे प्रतिबॅरल 82 अमेरिकन डॉलरवरून 120 डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. त्याचबरोबर आता रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळेच सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम आदी तेलकंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सपाटा लावला आहे.