पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
दहावीची लेखी ऑफलाईन परीक्षा गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे. बुधवारी दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 विषयाचा पेपेर होता. हा पेपर जयसिंगपूरमधून फुटल्याची वार्ता कळताच एकच खळबळ उडाली होती. पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळही घातला. परंतू फुटलेल्या पेपरचा सांकेतिक क्रमांक चुकीचा असल्याचे कळताच, पेपर फुटीची अफवा सोशल मिडीयावरून पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाला दिले आहेत.
बुधवारी दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 विषयाच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पेपेरचा सांकेतिक क्रमांक N-397 हा आहे. तर प्रत्यक्ष सुरू असलेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी केल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 मराठी माध्यमातच्या पेपरचा सांकेतिक क्रमांक N-744 हा व इंग्रजी माध्यमांचा N-745 हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अज्ञाताने चुकीच्या पध्दतीने मंगळवारपासूनच प्रश्नपत्रिका व्हायरल केली आहे. या चुकीच्या पध्दतीने खोडसाळपणे पेपर फुटीची अफवा उठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेपर फुटीच्या अफवांवर परीक्षार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
2020 चा पेपर एडीट करून व्हायरल
दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 विषयाचा पेपर होता. अज्ञाताने पैसे मिळवण्याच्या हेतूने मंगळवारपासून 2020 चा विज्ञानचा पेपर एडीट करून व्हायरल केला आहे. त्यामुळे अज्ञातावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जावू नये, असे आवाहनही शिक्षण मंडळाच्या वतीने केले आहे.
शरद गोसावी (अध्यक्ष, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ )