काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मायकल लोबो यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
गोव्याच्या राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. विरोधकांकडे 15 आमदार आहेत. आम्हाला व खास करून मला मुख्यमंत्री बनायचे नाही. मात्र कोणी आल्यास व पाठिंबा दिल्यास त्यांना मुख्यमंत्री बनवू, असे विधान काँग्रेसचे नवीन विधिमंडळ पक्षनेते व कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी लोबो यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्ये÷ नेते दिगंबर कामत यांची त्यांच्या मडगावच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी काँग्रेस पक्षाचे नवीन प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर त्यांच्यासोबत उपस्थित होते.
भाजपचे सरकार किती मजबूत आहे असे आपल्याला वाटते अशी विचारणा केली असता लोबो म्हणाले की, या पक्षात सध्या काँग्रेसमधून आयात केलेले कित्येक दिग्गज नेते आहेत. प्रत्येकजण स्वतःला मुख्यमंत्री समजत आहे. तेथे सगळेच आलबेल नाही. काँग्रेसचे 11, आप व मगोचे प्रत्येकी 2, गोवा फॉरवर्ड व आरजीपीचा प्रत्येकी 1 व तीन अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे कोणी असंतुष्ट पाठिंबा मागण्यासाठी आल्यास काहीही घडू शकते. ही शक्मयता फेटाळली जावू शकत नाही, असे मत एका प्रश्नावर बोलताना लोबो यांनी व्यक्त केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका निभावू
आम्ही काँग्रेसचे आमदार तसेच गोवा फॉरवर्ड व अन्य मिळून चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहोत. गोमंतकीयांच्या विरोधात काही होत असल्याचे दिसल्यास त्यास आम्ही कडाडून विरोध करणार व प्रसंगी रस्त्यावर उतरणार, असे लोबो यांनी सांगितले.
सासष्टीतील लोकांनी बोध घ्यावा
सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यंदा येथे आवश्यक यश आम्हाला मिळाले नाही. लोकांना भाजपाला दूर ठेवायचे होते. मात्र अन्य पक्षांना मते दिल्याने त्यांना पाहिजे होते तसे होऊ शकले नाही. यातून लोकांनी बोध घ्यायला हवा तसेच आम्ही कुठे चुकलो, ते पाहून सुधारणा करायला हव्यात, असे लोबो म्हणाले.
सासष्टीतून आम्ही कुंकळ्ळीचे युवा आमदार युरी आलेमाव यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे आणि ते सदर जबाबदारी पार पाडण्यास समर्थ आहेत. आमदार कामत व अन्य ज्ये÷ नेत्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला वेळोवेळी गरज भासेल व आम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस तसेच भाजप अशा राष्ट्रीय पक्षांच्या विधिमंडळ पक्षनेते व अन्य पदांची निवड ही केंद्रातूनच होत आली आहे. त्यात नवीन काही नाही. मगो, गोवा फॉरवर्ड असे स्थानिक पक्ष राज्यपातळीवर अशा निवडी करतात, असे उत्तर लोबो यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीबद्दल विचारले असता दिले.
पक्षबांधणीकडे लक्ष देणार : पाटकर
यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी आम्ही आमदार कामत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कायम सदस्य म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. पक्षश्रेष्ठींनी निवडलेली टीम ही युवा असून चाळीसही मतदारसंघांत पक्षबांधणीकडे तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही तेथे बूथस्तरापासून उभारणी करण्याकडे लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.