हुबळी प्रतिनिधी
जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबतचा दीर्घकाळ संबंध तोडण्याच्या आपल्या चर्चांना पूर्णविराम देत, कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आणि पुढील निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला.
यामुळे जेडीएसला उत्तर कर्नाटकातील एक ज्येष्ठ नेता गमवावा लागणार आहे. होराट्टी यांनी 1980 पासून सलग सात वेळा विधानपरिषद निवडणूक जिंकून एक विक्रम केला होता.
होराट्टी यांच्या कामगिरीवरील पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना होराट्टी म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी भाजपमध्ये निमंत्रण दिले आहे. त्यांच्या प्रस्तावाला होराट्टी यांनी संमती दिली आहे.
एका प्रश्नावर, त्यांनी स्पष्ट केले की भाजपमध्ये प्रवेश करण्याची तारीख विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर निश्चित केली जाईल. भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मी माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. मी भाजपमध्ये जाण्यास त्यांना कोणतीही अडचण नसून त्यांनी संमती दिली आहे,” ते म्हणाले.
भाजपमधील एका गटाने त्यांच्या प्रवेशाला केलेल्या विरोधाबाबत होराट्टी म्हणाले की, कोण आणि का विरोध करत आहे, याची पर्वा ते करत नाहीत. ते म्हणाले, ” येडियुरप्पा हे माझ्याशी या विषयावर बोलले होते त्यांनी माझ्या समावेशास पक्षाच्या हाय कमांडची संमती मिळवली आहे”