लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ : श्रीशैल यात्रेसाठी बसेसची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
गुढी पाडव्यानिमित्त प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने परिवहनच्या ऑनलाईन आणि आगाऊ तिकीट बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे तिकीट बुकिंग व्यवस्थाही थंडावली होती. मात्र, आता बससेवाही सुरळीत झाली आहे. त्याबरोबर गुढी पाडव्यानिमित्त ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगलाही प्रतिसाद वाढत आहे.
बेळगाव बसस्थानकातून मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, बेंगळूर, म्हैसूर, हैदराबाद, तिरुपती आदी लांब पल्ल्यासाठी बसेस धावत आहेत. त्याबरोबर हैदराबाद येथील श्रीशैल यात्रेनिमित्त प्रवास करणाऱया भाविकांची संख्या वाढली आहे. शिवाय बसस्थानकातून विशेष 10 बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे बुकिंग वाढले आहे.
मासिक, दैनंदिन पासला प्रतिसाद
याबरोबरच बाजारपेठ आणि उद्योगधंदे पूर्वपदावर आल्याने ये-जा करणाऱया कामगार, नोकरदारवर्गाची संख्या वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन आणि मासिक पास घेणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरापुरती मर्यादित प्रवासासाठी 700 रुपये आणि ग्रामीण भागात प्रवासासाठी 1300 रुपयात मासिक बसपास दिला जातो. बुकिंगबरोबर मासिक आणि दैनंदिन पासला प्रतिसाद वाढत आहे.
एकाच मार्गावरून दररोज प्रवास करणाऱया प्रवाशांच्या पैशांची बचत व्हावी याकरिता सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, गत दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थी बसपास, दैनंदिन बसपास आणि मासिक बसपासलाही प्रतिसाद थंडावला होता. त्यामुळे परिवहनचे उत्पन्नही थांबले होते. मात्र, आता बुकिंगबरोबर पासलाही प्रतिसाद वाढत असल्याने महसूलही काही प्रमाणात वाढत आहे.