कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील स्वामी मळा भागात राहणाऱ्या संतोष भानुदास चव्हाण (वय ३९) यांच्या घराला लावलेले कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप व मोबाईल मिळून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चव्हाण हे कुपवाडमधील स्वामी मळा येथे राहत असून त्यांचा मशीनशॉप आहे. ते १७ ते २९ मार्च या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराला लावलेले कुलूप कशाने तरी तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीतील लॉकरमध्ये ठेवलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, एक लॅपटॉप व एक मोबाईल असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. घरमालक संतोष चव्हाण घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत चव्हाण यांनी कुपवाड पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.