आमदार बेनके यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानक इमारतीवर वीर पुरुषांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. परंतु यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नसल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचा समावेश करावा, अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बुधवारी बेनके यांनी रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात त्यांची भेट घेतली. याचसोबत बेळगाव परिसरात सुरू असलेल्या रेल्वेच्या विकासकामांबद्दल चर्चा करण्यात आली. बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. बेळगावला भेट दिलेल्या तसेच या परिसरात कार्य केलेल्या वीर पुरुष तसेच घटनांची प्रतिमा करून ती स्थानकाच्या मुख्य इमारतीवर लावण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी, राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, कमल बस्ती, काँग्रेस अधिवेशन यासह इतर प्रतिमा उभ्या करण्यात आल्या आहेत. परंतु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक समानतेचा संदेश देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रतिमा त्वरित रेल्वेस्थानक परिसरात लावाव्यात, अशी मागणी बेनके यांनी निवेदनाद्वारे केली. मंत्री दानवे यांनी याची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना याबाबत सूचना केल्या. आमदार बेनके यांनी निवेदनाची दखल घेतल्याबद्दल दानवे यांचे आभार मानले.