जिल्हा राष्ट्रवादीकडून केला तीव्र निषेध; हल्ल्यापाठीमागील शक्तींना दिला इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध कण्रयात आला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अशा प्रकारे घरावर हल्ला करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि लोकशाहीला धरून नाही . 80 वर्षांची वृद्ध व्यक्ती , पत्नी, नात घरात असताना जमावाला चिथावून नियोजनबद्ध हल्ला करणे निंदणीय असून त्यांच्या पाठीमागे असणाऱया शक्तींना ते महागात पडेल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, राज्यातील आणाजी पंताच्या औलादीचे हे चुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार यांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असे काय घडले की त्यांना हातात दगड घेण्याची वेळ आली ? संविधानिक पद्धतीने हा देश आणि राज्य चालावे ही आमची भूमिका आहे. मात्र ज्यांना संविधानिक पद्धतच मान्य नसेल तर अश्या लोकांच्या घरात आम्ही पण घुसल्या शिवाय राहणार नाही. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते पवार यांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, याचा तीव्र शब्दांत निषेध आहे. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे सुत्रधार आणि दगडफेक करणाऱया लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरलो तर अशा प्रवृत्तीला धडा शिकवू असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष साळोखे यांनी दिला आहे.