ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीबाहेरील लाऊडस्पीकर काढावेत, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज रामनवमीचे औचित्य साधून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण केली.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा लाऊडस्पीकरद्वारे लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी हे लाऊडस्पीकर जप्त करत किल्लेदार यांच्यासह काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवसेना भवनाबाहेर पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यासंबंधीचे काही फोटोही समोर आले आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.