ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट उंच प्रतिमेचे (hanuman statue) अनावरण केले. सकाळी 11 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
पीएमओच्या म्हणण्यानुसार, भगवान हनुमानाशी संबंधित चार धाम प्रकल्पांतर्गत हनुमानाची मूर्ती देशाच्या चार दिशांना बसवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तर दिशेला म्हणजेच शिमला येथे स्थापित करण्यात आली होती. मोरबी येथे स्थापित करण्यात आलेली या मालिकेतील दुसरी मूर्ती आहे.
दरम्यान, हनुमान जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ”शक्ती, धैर्य आणि संयमाचे प्रतीक असलेल्या हनुमानाच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा. पवनपुत्राच्या कृपेने प्रत्येकाचे जीवन सामर्थ्याने व बुद्धीने सदैव भरून जावे”,अशा शब्दात मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.