वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होणाऱया भारताच्या वरिष्ठ 30 मल्लांना त्यांच्या पूर्वतयारीसाठी भारतीय क्रीडा प्राधीकरण मंडळाने (साई) 1.28 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. 30 वरिष्ठ मल्लांमध्ये ऑलिंपिक पदक विजेते रवी दाहिया आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे.
आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरूष विभागात फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन प्रकारांसाठी 20 मल्ल तसेच 10 महिला मल्ल सहभागी होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी भारतीय पुरूष आणि महिला मल्लांच्या विदेशी दौऱयाकरिता 1.28 कोटी रूपये खर्च येणार असून साईने या निधीला मंजुरी दिली आहे. भारताची महिला मल्ल अन्शु मलिक मंगोलियात होणाऱया आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या लखनौच्या साई केंद्रामध्ये मल्लांच्या पूर्वतयारी आणि सरावाकरिता जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्याचे मलिकने म्हटले आहे.
पुरूष संघ- फ्रीस्टाईल- रवी दाहीया, मंगल कादीयन, बजरंग पुनिया, नवीन, यश, गौरव बलीयन, दीपक पुनिया, व्हिकी, सत्यवर्त कादियन, अनिरुद्ध कुमार, ग्रीको रोमन- अर्जुन हालाकुर्की, ज्ञानेंदर, नीरज, सचिन सेहरावत, विकास, साजन, हरप्रित सिंग, सुनीलकुमार, रवी, प्रेम.
महिला संघ- मनिषा, स्वाती शिंदे, सुषमा शोकीन, अन्शु मलिक, सरिता मोर, मनिषा, राधिका, सोनिका हुडा, निक्की, सुदेश.