माजी सैनिकांची शासकिय कार्यालयातील कामे होणार जलद : राज्य सरकारचे सकारात्मक पाऊल : जिल्हा व तालुकास्तरावर समित्या कार्यान्वित होणार : जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरु
प्रविण देसाई / कोल्हापूर
राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटुंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे ते 15 जून या कालावधित ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा व तालुकास्तरावर समित्या नियुक्त करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही सुरु आहे.
विविध शासकिय विभागांमध्ये माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांची अनेक कामे असतात. यामध्ये महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, विनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड आदी, पोलिस विभागाकडे विविध तक्रारी, समाजकंटकांकडून होणार्या त्रासाच्या तक्रारी, जमिनीच्या हद्दी व पाणी यावरून होणारे फौजदारी स्वरुपाचे वाद आदी, ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी आदी, कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्याकरिता प्रस्ताव तयार करणे. सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने, तसेच इतर अनेक विभागाकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेऊन, माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न विशेष प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय व प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु आहे.
महिन्याच्या तिसर्या सोमवारी ‘अमृत सन्मान दिना’चे आयोजन
या अभियानामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित करून लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख व सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर अभियानाच्या कालावधीत त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मेळावे ही घेण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी
नियोजित जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी यासह 16 सदस्य व निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी
नियोजित तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे प्रांताधिकारी असणार आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये पोलीस उप अधिक्षक, गटविकास अधिकारी, सह निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख हे सदस्य तर तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी हे विशेष निमंत्रित व तहसिलदार हे सदस्य सचिव असणार आहेत.
राज्य सरकारकडून 1 मे पासून ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर समित्या नेमण्याचे निर्देश आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
-प्रशांत खेडेकर, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी