ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे कॉंग्रेसचे नेते रणदिप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. कॉंग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्यापूढे ठेवला होता. मात्र सुरजेवाला यांच्या ट्विटनंतर प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस चालू असतानाच आज कॉंग्रेसचे नेते रणदिप सुरजेवाला यांनी प्रशांत किशोर यांच्या प्रवेशासंदर्भात ट्विट करून सर्व चर्चां थांबवल्या. आपल्या ट्विट मध्ये ते प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव नाकारला असल्याचे सांगताना “काँग्रेस अध्यक्षांनी प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरण आणि चर्चेनंतर, एक सक्षम कृती गट-2024 ची स्थापना केली आहे. तसेच त्यांना काही विशेष जबाबदारीसह कॉंग्रेसने स्थापन केलेल्या गटाचा भाग म्हणून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रितही केले होते. पण या प्रस्तावाला त्यांनी नकार दिला आहे. कॉंग्रेस पक्ष त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे कौतुक करतो.” असे रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सांगितले आहे.