सेन्सेक्समध्ये 777 अंकांची तेजी : दोन सत्रांच्या घसरणीला विराम
मुंबई :
गेल्या दोन सत्रांच्या कामगिरीत भारतीय भांडवली बाजारात घसरणीचा कल राहिला होता. मात्र चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारच्या कामगिरीत बीएसई सेन्सेक्स 777 अंकांची उसळी घेत बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारातील मजबूत हिस्सेदारी ठेवणाऱया समभागांनी बाजाराला मजबुती मिळवून देण्यास मदत केल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने जागतिक बाजारात तेजी राहिल्याने प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये लिलाव झाला तसेच अन्य काही कंपन्यांनीही सकारात्मक कामगिरी केल्याने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 776.72 अंकांनी वधारुन निर्देशांक 57,356.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 246.85 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,200.80 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये मंगळवारी पॉवरग्रिड कॉर्प, टायटन, महिंद्रा ऍण्ड महेंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन ऍण्ड टुब्रो, स्टेट बँक, भारती एअरटेल आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग प्रामुख्याने मजबूत स्थितीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र ऍक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, मारुती सुझुकी आणि टीसीएस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील विविध घडामोडींची स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी लाभात राहिले. तर चीनचा शांघाय कम्पोझिट मात्र घसरणीसह बंद झाला आहे. युरोपमधील मुख्य बाजारात दुपारपर्यंत ट्रेडिंगमध्ये तेजी राहिली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.75 टक्क्यांनी घटून 101.55 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.