परवाने मिळविण्यास येणार नाहीत अडचणी : मे अखेरपर्यंत नवे औद्योगिक धोरण तयार
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात येणाऱया उद्योगांचे स्वागत करण्यासाठी आता उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी पुढाकार घेतला असून यानंतर उद्योगासाठी परवाने मागण्यास येणाऱया उद्योगांना इतर सर्व परवाने मिळेपर्यंत वाट पहाण्याची गरज पडणार नाही. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर उद्योजक बिनधास्तपणे आपल्या उद्योग उभारणीला प्रारंभ करू शकतात. गोवा उद्योगाच्या नव्या धोरणाचा मसुदा तयार झाला असून मे अखेरपर्यंत नवे उद्योग धोरण तयार होईल. त्यात या महत्त्वाच्या मुद्याचा समावेश केलेला आहे. यानंतर कोणीही उद्योग प्रकल्प अडवू शकणार नाही.
गेली काही वर्षे निद्रावस्थेत असलेल्या उद्योग खात्याला उर्जीतावस्था प्राप्त करून देण्यासाठी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे.
सध्याच्या धोरणाने होतेय अडवणूक
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजुरी दिल्यानंतर देखील अनेक उद्योजकांनी गोव्यात आयत्यावेळी काढता पाय का घेतला? याची चौकशी केली असता गुंतवणूक मंडळाने प्रोत्साहन दिले खरे, परंतु इतर काहींनी एवढी सतावणूक केली, अडवणूक केली की उद्योजकांना कशाला आपण गोव्यात आलो, असे वाटू लागले. त्यावर पर्याय व उतारा म्हणून माविन गुदिन्हो यांनी आयडीसी कायद्यातही आता दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे. शिवाय नवे उद्योग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.
अधिकाऱयांना पाठविले अभ्यास दौऱयावर
नव्या उद्योग धोरणाचा मसुदा तयार केला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी व अंतिम स्वरुप देण्याअगोदर उद्योग सचिव आणि उद्योग संचालकांना इतर राज्यांमध्ये औद्योगिक धोरण कसे आहे, उद्योगांना ते कसे प्रोत्साहन देतात यासंदर्भातील अभ्यास करून अहवाल राज्य सरकारला सादर करा असे सांगितले आहे. दोन्ही अधिकारी दोऱयावर गेले आहेत.
ई उद्योग, पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन
उद्योगमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, आम्ही गोव्यात पर्यावरणपुरक उद्योगांना प्रोत्साहन देणार आहोत. याशिवाय ई उद्योगांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे अशा उद्योग प्रकल्पांचे प्रस्ताव जेव्हा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे येतील, त्याअगोदर उच्च विचार समितीची एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत सदर उद्योगाशी संबंधित सर्व खात्यांच्या संबंधित अधिकाऱयांना बोलाविले जाईल. बैठकीत प्रस्ताव मांडले जातील. प्रत्येक प्रस्तावाबाबत सखोल चर्चा होईल. कोणाचे आक्षेप असतील तर तिथल्या तिथे नोंद करून घेतली जाईल. मागाहून कोणतीही तक्रार नको. सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव गुंतवणूक मंडळासमोर जाईल. तिथे मान्यता मिळाल्यानंतर ताबडतोब प्रकल्प उभारणीचे काम उद्योजक सुरू करू शकतो.
गोमंतकीयांना रोजगार देण्याची अट
गोमंतकीयांना रोजगार देण्याची अट मात्र संबंधित उद्योगांना घातली जाईल. सदर उद्योग प्रकल्प पूर्ण होईपर्यंत इतर सर्व परवाने त्याला मिळतील. गुंतवणूक मंडळाची परवानगी मिळाल्यानंतर सारी यंत्रणा उद्योजक गोव्यात आणू शकतो. वर्षभरात उत्पादन सुरु करू शकतो. तेलंगणा, गुजरात सारख्या राज्यांनी ज्या लोकप्रिय योजना उद्योगांना लागू केल्या तशाच पद्धतीच्या आम्ही लागू करू व गोव्यात उद्योगाचे जाळे विस्तारू असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.