बेळगाव : बेंगळूर येथे सुरू असलेल्या दुसऱया खेलो इंडिया युनिव्हर्सिटी क्रीडा महोत्सवात वेटलिफ्टिंगमध्ये बेळगावमधील हलगा गावची कन्या अक्षता बसवंत कामती हिने 87 किलो वजन गटात 196 गुणासह सलग तिसऱया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.
बेंगळूर येथील जैन युनिव्हर्सिटीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 87 किलो वजनी गटात खेळताना अक्षता कामतीने स्नॅचमध्ये 80 किलो व क्लीन अँड जर्कमध्ये 117 किलो असे एकूण 197 वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. चंदिगडच्या दिप्तीने रौप्यपदक तर केरळच्या बिन्सीने कांस्यपदक मिळविले. खेलो इंडियातील तिच्या या कामगिरीमुळे पुढील महिन्यात होणाऱया आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी अक्षताची निवड करण्यात आली आहे. अक्षताला बेंगळूरचे प्रशिक्षक विरपोल, शामला शेट्टी, मिनाक्षी सुंदरेश्वरी व बेळगावचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.