ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात (kulgam,jk) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी चकमकीदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, हैदर असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळी 8.40 च्या सुमारास सकाळी 8.40 च्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली, मात्र दहशतवाद्यांचा मागमूसही लागला नाही. मात्र, रात्री उशिरापासून कुलगामच्या देवसर परिसरात गोळीबार सुरू आहे. जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लष्कराच्या घेऱ्यात अडकले असून, सध्या या भागात चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी अनंतनाग जिह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी मारले गेले. जिल्ह्यातील पहलगाम भागातील श्रीचंद वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दशहतवाद्यांचा खात्मा केला.