कुपवाड /प्रतिनिधी
कुपवाड परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ माजवला आहे. सोमवारी पहाटे एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या कळपाने कुपवाडमधील हनुमाननगर भागात दोनठिकाणी गोठयात बांधलेल्या लहान रेडकांवर हल्ला केला. यात दोन रेडकांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला.
दरम्यान, शहरात आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी आणि वर्दळीच्या रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुपवाडकरांच्या मागणीला केराची टोपली दाखवून मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
सोमवारी पहाटे हनुमाननगर भागात राहणाऱ्या संजय तोडकर आणि महेंद्र पाटील या दोघांच्या जागेतील गोठयात बांधलेल्या दोन रेडकांवर मोकाट कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवला. या हल्ल्यात बऱ्याच ठिकाणी मोठमोठे लचके तोडल्याने दोन्ही रेडके जागीच ठार झाली. दोन्हीपैकी एका रेडकाचा फडशा पाडला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात तोडकर व पाटील यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कुपवाड शहरात गेल्या काही महिण्यापासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पाळीव प्राण्यावर हल्ला करणे, रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर धावून चावा घेऊन जखमी करणे, असे प्रकार वारंवार घडू लागल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे. एका रात्रीत दोन रेडकांचा बळी गेल्याने आता तरी मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा नागरिकांतून सवाल व्यक्त होत आहे.