अमेरिकेच्या खासदारांचा कीव्ह दौरा ः झेलेंस्की यांची घेतली भेट
वृत्तसंस्था / कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाला 80 दिवस झाले असले तरीही युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचे हल्ले अद्याप सुरूच आहेत. याचदरम्यान युक्रेनच्या सैन्याने देशातील दुसऱया क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून रशियन सैनिकांना हुसकावून लावले आहे. खारकीव्हची टेरिटोरियल आर्मी आणि युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या प्रयत्नांमुळे रशियाच्या सैन्याला काढता पाय घ्यावा लागल्याचे खारकीव्हचे महापौर इहोर तेरखोव्ह यांनी सांगितले आहे.
तर अमेरिकेच्या खासदारांनी शनिवारी राजधानी कीव्हमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली आहे. झेलेंस्की यांनी यावेळी रशियाला दहशतवादाचा पुरस्कर्ता देश म्हणून घोषित करण्याची मागणी केली. अमेरिकेकडून रशियावरील निर्बंध अधिक कठोर केले जातील असा भरवसा असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
युद्धामुळे युक्रेनमधील रेल्वेजाळय़ाचा 23 टक्के हिस्सा उद्ध्वस्त झाला आहे. रेल्वेवाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी आता मोठा खर्च करावा लागणार आहे. रशियाने युक्रेनच्या रेल्वेवाहतुकीला मोठय़ा प्रमाणात लक्ष्य केले आहे. पूर्व युक्रेनच्या डोनेट्स्क भागात रशियाने हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. रशियाचे सैन्य डोनेट्स्कच्या सिविएरोडोनेट्सक, सोलेदार आणि बखमुट शहरांवर हल्ल्याची तयारी करत आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी शनिवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. युक्रेन विरोधात रशियाच्या युद्धाचे समर्थन करणाऱया राजकीय पक्षांवर बंदी घालण्याचा अधिकार हा कायदा प्रदान करतो. रशियाने क्रीमिया आणि पूर्व डोनबाससह युक्रेनच्या भागांवर रशियाने कब्जा केला नसल्याचा दावा करणाऱया राजकीय पक्षांवरही या कायद्याच्या अंतर्गत बंदी घातली जाणार आहे.
सीमेवर शांततेची इच्छा ः फिनलंड
फिनलंडचे विदेशमंत्री पेक्का हाविस्टो यांनी शनिवारी नाटोच्या बैठकीत महत्त्वाचे विधान केले आहे. फिनलंड रशियासोबतच्या स्वतःच्या सीमांवर शांतता राखू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फिनलंड आता नाटोमध्ये सामील होण्याच्या उंबरठय़ावर आहे. फिनलंडची रशियाला लागून 1,300 किलोमीटर लांबीची सीमा आहे. रशियासोबत संपर्क कायम ठेवण्याची गरज असल्याचे हाविस्टो यांनी नमूद केले आहे.
जर्मनीकडून समर्थन
जर्मनीच्या विदेशमंत्री एनालेना बारबॉक यांनी फिनलंड आणि स्वीडनच्या नाटोमधील सहभागाचे समर्थन करत असल्याचे उद्गार काढले आहेत. प्रत्येक देश कुठल्याही आघाडीचा सदस्य होण्यास स्वतंत्र आहे. हा नियम स्वीडन आणि फिनंलडवरही लागू होतो. नाटोने स्वीडन आणि फिनलंडला सामील करण्यासाठी कुठलेच प्रयत्न केलेले नाही. रशियाच्या हल्ल्यामुळे फिनलंड आणि स्वीडनला धक्का पोहोचला आहे, कारण दोन्ही देश स्वतःच्या शेजाऱयांसोबत शांततेत राहू इच्छितात असे बारबॉक यांनी म्हटले आहे.