जमिनी संबंधीच्या कामासाठी पाच हजाराची लाच घेताना कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
जमिनी संबंधीच्या कामासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठय़ाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एसीबीच्या अधिकाऱयांनी बुधवारी ही कारवाई केली आहे.
जगदीश कित्तूर असे त्या तलाठय़ाचे नाव आहे. सचिन शांतीनाथ ऊर्फ शांतू शिंदे (रा. गणकोडी) यांच्याकडून लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सचिन यांच्या जमिनीसंबंधी रायबाग तहसीलदार कार्यालयातून आलेल्या जे फॉर्मवर सचिन व त्यांच्या कुटुंबीयांची सही घेऊन अंतिम अहवाल सादर करण्यासाठी तलाठय़ाने लाच मागितली होती.
सचिन यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. उत्तर विभागाचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.