नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने 8 जूनला पाचारण केलेले असताना काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी त्यांची चाचणी झाली तेव्हा त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती काँगेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
सोनिया गांधी याना सौम्य ताप आला असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राहुल गांधींनाही ईडीची नोटीस आली असून त्यांना 2 जूनला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तथापि, ते दिल्लीत नसल्याने ईडीच्या मुख्यालयात आलेच नाहीत. आता सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्याने त्या 8 जूनला उपस्थित राहू शकतील की नाही हे अस्पष्ट आहे.
घाबरणार नाही
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करीत आहे. ईडी इत्यानी संस्था सरकारच्या हातातील बाहुले असून त्यांचा उपयोग राजकीय सूडबुद्धीने केला जात आहे. मात्र काँगेसचे कोणतेही नेते पळूनही जाणार नाहीत, किंवा मान झुकवणार नाहीत. आम्ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहोत, असे वक्तव्य काँगेस पक्षाकडून देण्यात आले आहे.